वरिष्ठ पातळीवरून महायुतीचा निर्णय झाल्यास महायुती म्हणून लढणार अन्यथा स्वबळावर लढण्याचीही तयारी-दीपक नागले

राजापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीचा निर्णय झाल्यास राजापूर तालुक्यातही शिवसेना, भाजपा व मित्र पक्ष महायुती म्हणून या निवडणूका लढवू. मात्र महायुती झाली नाही तर शिवसेना सर्व जागा स्वबळावर लढविण्यासही तयार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले यांनी दिली आहे.
मंगळवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांची घोषणा झाली आहे. त्यानंतर राजापुरात आलेल्या नागले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतील एकूणच व्यूहरचना व पक्षाची भूमिका मांडली.
नुकतीच झालेली नगर परिषद निवडणूक आंम्ही महायुती म्हणून लढविलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीचा निर्णय झाल्यास व तसा आदेश आल्यास राजापूर तालुक्यातही शिवसेना, भाजपा व मित्र पक्ष महायुती म्हणून या निवडणूका लढवू असे नागले यांनी सांगितले. मात्र जर महायुती झाली नाही तर शिवसेना सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व राजापूर, लांजा साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली आंम्ही काम करत आहोत. त्यांच्या माध्यमातुन गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. ग्रामीण भागातही आमच्या शिवसेनेची संघटनात्मक पातळीवर मोठी ताकद आहे. त्यामुळे या निवडणूकीत इच्छुकांची संख्याही मोठी आहे. अनेक इच्छुकांनी पक्षाकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळावी असे अर्जही सादर केलेले आहेत. प्रत्येक गण व गटात तीन ते चार जण पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. खास करून वडदहसोळ गट व गणात इच्छुकांची संख्या मोठी आहे. अनेक ठिकाणी पुरूष उमेदवारांबरोबरच महिला उमेदवारांची इच्छुक म्हणून संख्या देखील मोठी आहे. निश्चितच ही बाब संघटना भक्कम व बळकट असल्याचे द्योतक आहे. या निवडणूकीतही आमदार किरण सामंत जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचा निर्धार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेला आहे असेही नागले यांनी सांगितले.
राजापूर न. प. निवडणूकीतील पराभव नियोजनाच्या अभावमुळे
राजापूर नगर परिषदेच्या निवडणूकीत आमच्याकडूनच थोडी चुक झाल्याचे नागले यांनी मान्य केले. आमच्याकडून नियोजनातही काही त्रुटी राहिल्या त्यामुळे नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला व थोडक्यात सत्ता हुकली. अगदी उमेदवार जाहिर करण्यास झालेला विलंबही याला कारणीभूत असू शकतो अशी प्रांजळ कबुलही त्यांनी दिली. मात्र निश्चितच या चुका भविष्यात आंम्ही सुधारू व आ. किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाली गती देऊ. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत अत्यंत सुक्ष्म असे नियोजन करून सर्वच्या सर्व जागा जिंकून पंचायत समितीत सत्ता स्थापन करतानाच जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत राजापूर तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल असा दावाही नागले यांनी केला.