लांजा न.पं. उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक १६ जानेवारी रोजी

उपनगराध्यक्षपदी मिलिंद लांजेकर यांचे नाव निश्चित?
स्वीकृत नगरसेवक पदासाठी सचिन डोंगरकर, दुर्वा भाईशेट्ये यांचे नाव चर्चेत

संतोष कोत्रे
लांजा -: लांजा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक पदासाठी शुक्रवारी १६ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी मिलिंद (बाबा) लांजेकर यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले असल्याचे समजते.‌ तर स्वीकृत नगरसेवक पदावर सौ.‌दुर्वा भाईशेट्ये आणि सचिन डोंगरकर यांची वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लांजा नगर पंचायतीची निवडणूक २ डिसेंबर रोजी झाली होती.‌ २३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. नगर पंचायतीवर शिवसेनेने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे.‌ नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सावली सुनील कुरूप तर
१७ पैकी १० जागांवर महायुतीचे नगरसेवक निवडून आले होते.‌ ६ ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आलेले होते. तर एका जागेवर शिवसेनेचा (उबाठा) नगरसेवक निवडून आलेला आहे. सावली कुरूप यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.‌
त्यामुळे उपनगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत नगरसेवक पदावर कोणाची निवड होणार? याकडे लांजा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.‌ ही निवडणूक शुक्रवारी १६ जानेवारी रोजी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.‌ असे असले तरी शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याचे समजते.
त्याचप्रमाणे स्विकृत नगरसेवक पदासाठी कोणाला लॉटरी लागणार? याकडे देखील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र या दोन स्विकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक व शहर प्रमुख सचिन डोंगरकर आणि माजी नगरसेविका सौ दुर्वा प्रसाद भाईशेट्ये यांची वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी अधिकृत निवड ही शुक्रवारी होणार असल्याने त्याकडे लांजा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे