राजापूर प्रतिनिधीः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन महायुतीचा निर्णय झाल्यास राजापूर तालुक्यातही शिवसेना, भाजपा व मित्र पक्ष महायुती म्हणून या निवडणूका लढवून एकदिलाने काम करुन राजापूर पंचायत समितीसह जिल्हापरिषदेवर युतीची सत्ता आणण्याचा निर्धार भाजपाचे राजापूर पश्चिम मंडल अध्यक्ष मोहन घुमे यानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे .
मंगळवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांची घोषणा झाली आहे. त्यानंतर मोहन घुमे यानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतील एकूणच व्यूहरचना व पक्षाची भूमिका मांडली असुन वरिष्ठ पातळीवरुन जागावाटपाबाबत जो निर्णय होइल तो मान्य करुन आम्ही महायुती म्हणुन जोमाने काम कृन या निवडणुकीत विजयश्री खेचुन आणु असा विश्वासही यावेळी मोहन घुमे यानी व्यक्त केला आहे .
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातुन राजापूर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यानी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यानीही वेळोवेळी येथील विकासकामाना निधी उपलब्ध करुन दिला आहे . त्यामुळे राजापूरातील जनतेच्या महायुतीकडुन अपेक्षा वाढल्या आहेत . आमदार किरण सामंत यांच्या कामाची पध्दत व कामाचा निपटारा पाहता पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी मोहन घुमे यानी मांडले आहे .
राजापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी महायुतीच्या माध्यमातुन सर्वाधिक निधी येत असुन गेल्या वर्षभराच्या काळात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत . यावेळी पंचायत समितीवर महायुतीचाच भगवा फडकवण्यासाठी राजापूर भाजपा कंबर कसुन काम करेल असा विश्वासही यावेळी घुमे यानी व्यक्त केला.











