छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे येथे भारतीय सेना दिन उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) – शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे येथे १५ जानेवारी भारतीय सेना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शूर जवानांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमात देशभक्तीचा उत्कट भाव वातावरणात भरून राहिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. शोकसभा घेत त्यांना पुष्पांजली अर्पण करत दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य डॉ. खोत, कमांडंट श्री किशन यादव, संस्थेचे खजिनदार सुभेदार काशिनाथ सकपाळ, मिलिटरी विभागाचे अधिकारी श्री सचिन मोरे, सुभेदार श्री विलास मोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री नगारे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त करणाऱ्या या सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडाटात कौतुक केले.
यानंतर प्रशालेचे कमांडंट श्रीकृष्ण यादव यांनी भारतीय सेनेचा इतिहास, रचना, कामकाज आणि शौर्यपरंपरेची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. देशसेवेची भावना प्रत्येक विद्यार्थ्यात जागृत व्हावी, यासाठी त्यांनी काही प्रेरणादायी जीवनदाखलेही सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कॅप्टन आखाडे डी. डी. यांनी आपल्या सैनिक जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. “जीवनात प्रथम देश आणि त्यानंतर कुटुंब” या विचाराची महती त्यांनी प्रभावी भाषणातून स्पष्ट केली. देशाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक आणि शारीरिक तयारी, शिस्त आणि ध्येयनिष्ठा याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे खजिनदार सुभेदार काशिनाथ सकपाळ यांनी सर्व मान्यवरांचे, शिक्षकवर्गाचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. भारतीय सेना दिनाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होत शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.