मित्राच्या घरात गोळीबार; २४ वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला

पुणे ग्रामीण भागात खळबळ उडवणारी हत्या समोर आली आहे. २४ वर्षीय तरुणाची मित्राच्या घरात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह डोणजे गावाजवळील नाल्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणि नांदेड शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मित्रांमधील वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.


मित्रांसोबत जेवण, रात्रीच घडला रक्तरंजित प्रकार

पुणे : मंगळवारी रात्री उशिरा एका २४ वर्षीय तरुणाची त्याच्या मित्राच्या घरात गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी मृतदेह डोणजे गावाजवळील नाल्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी मृत तरुणाचे नाव विशाल चव्हाण (रा. खडकवासला, कोल्हेवाडी) असे जाहीर केले आहे.

या प्रकरणात सहा आरोपी असल्याची माहिती असून, त्यापैकी एकाला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी नांदेड शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी नांदेड शहर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे.

वादातून गोळीबार; डोक्यात गोळी लागून मृत्यू

हवेली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, बुधवारी डोणजे परिसरातील नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यानंतर हातावरील टॅटूच्या आधारे चव्हाण यांच्या नातेवाईकांनी ओळख निश्चित केली.

शवविच्छेदन अहवालात गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चव्हाण यांच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की, मंगळवारी रात्री तो मित्राच्या घरी जेवायला गेला होता. त्या वेळी त्याचे सहा मित्र तेथे उपस्थित होते. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पालकांनी संपर्क साधला, मात्र त्यानंतर चव्हाण यांनी फोन उचलला नाही.

तपासादरम्यान आरोपींनी चव्हाण आणि मित्रांमध्ये वाद झाल्याची कबुली दिली. वाद वाढल्यानंतर धमकावण्यासाठी देशी बनावटीचे पिस्तूल काढण्यात आले आणि गोळी झाडली गेली, असा दावा करण्यात आला आहे. चव्हाण यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घाबरलेल्या आरोपींनी मृतदेह नाल्यात फेकून दिला. पुढील तपासासाठी हे प्रकरण नांदेड शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.