मसुरे | झुंजार पेडणेकर :करिअर कट्टा विभागा मार्फत आयोजित विविध उपक्रमांमुळे विद्यार्थांना भविष्यातील करिअरच्या विविध संधी व योग्य करिअर निवड याविषयी मार्गदर्शन महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना मिळते याचा विद्यार्थ्यांनी स्वतःचे उज्वल करिअर करण्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल नाईक यांनी कट्टा महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागात मार्फत आयोजित युवा प्रेरणा दिन कार्यक्रम प्रसंगी केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र अंतर्गत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा च्या “करिअर कट्टा” विभागामार्फत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय युवा दिन हा युवा प्रेरणा दिन म्हणून महाविद्यालयात मोठ्या उल्हासित वातावरता साजरा करण्यात आला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य पाठबळ व दिशा देण्याचे काम महाविद्यालयांमध्ये कार्यरत करिअर कट्टा विभाग करीत आहे. एम.पी.एस.सी. यू.पी.एस.सी. पोलिस, यासारख्या स्पर्धा परीक्षा तसेच उद्योजकता याविषयी तज्ञ मार्गदर्शकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या विभागामार्फत केले जाते. यामुळे करिअर विषयीं विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण होऊन स्वतःचे ध्येय निश्चित करणे त्यांना सोपे जाते, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्तं केले.
या कार्यक्रम प्रसंगी बारामती येथे करिअर कट्टा विभाग आयोजित पाच दिवसीय राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशन २०२६ मध्ये सहभागी कु. संचिता करावडे, कु. प्राची परब, कु. निकिता मेस्त्री, कु. विद्देश बाईत, कु. पांडुरंग परब, कु. प्रणय चव्हाण इ.विद्यार्थ्यांना कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे सचिव सुनिल नाईक यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अधिवेशनात सहभागी विद्यार्थांनी आपल्या मनोगतातून अधिवेशनातील अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालय करिअर कट्टा प्रमुख प्रा. श्रुती कुंभार यांनी केले.











