पॉलिटेक्निक विभागाची ‘जनरल चॅम्पियनशिप’वर मोहोर
अथर्व काणे व सानिया वाईरकर ठरले पहिले ‘मिस्टर अँड मिस बीकेसी’
सावंतवाडी । प्रतिनिधी :
भोसले नॉलेज सिटीचे बहुप्रतीक्षित वार्षिक स्नेहसंमेलन ‘डॅझेलिया २०२६’ काल अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. संस्थेच्या इतिहासात प्रथमच सर्व महाविद्यालयांचा एकत्रित सहभाग असलेले हे स्नेहसंमेलन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले. कर्नल (नि) रत्नेश सिन्हा यांच्यासह प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, डॉ. विजय जगताप, सत्यजित साठे आणि मुख्याध्यापिका प्रियंका देसाई उपस्थित होत्या.
”अशा स्नेहसंमेलनांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सांघिक भावना वाढीस लागावी यासाठी भोसले नॉलेज सिटी सदैव कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन कार्याध्यक्ष अच्युत भोसले यांनी यावेळी केले.
पॉलिटेक्निकची सरशी, फार्मसीचे ‘मिस्टर अँड मिस’
गेल्या पंधरा दिवसांपासून कॅम्पसमध्ये विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची रणधुमाळी सुरू होती. या चुरशीच्या स्पर्धांमध्ये खालील विभागांनी जेतेपदावर नाव कोरले:
बीकेसी जनरल चॅम्पियनशिप: यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक विभाग.
स्पोर्ट्स चॅम्पियनशिप: यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक विभाग.
कल्चरल चॅम्पियनशिप: यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज.
यावर्षीचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पहिल्या ‘मिस्टर अँड मिस बीकेसी’ स्पर्धेत फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. अथर्व काणे याने ‘मिस्टर बीकेसी’ तर सानिया वाईरकर हिने ‘मिस बीकेसी’ हा मानाचा किताब पटकावला.
अडीच हजार विद्यार्थ्यांचा उत्साह
या सोहळ्यासाठी सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आकर्षक रोषणाई, आधुनिक ध्वनी व प्रकाश यंत्रणा आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण कॅम्पस भारावून गेला होता. विद्यार्थ्यांनी लावलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अमर प्रभू आणि बोनी शेरॉव्ह यांनी केले.
एकूणच ‘डॅझेलिया २०२६’ हे स्नेहसंमेलन भोसले नॉलेज सिटीच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि संस्मरणीय सोहळा ठरला, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.












