रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि कराओके कलाप्रेमी सिंगिंग क्लब देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत कुडाळ येथील ऐश्वर्या चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर आदित्य आचरेकर (कुडाळ) यांनी द्वितीय आणि वैष्णवी चव्हाण (वेंगुर्ला) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी वेंगुर्ला येथील भुषण तुळस्कर यांनी प्रथम, तर पडेल येथील राजेश घाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचे परीक्षण परीक्षक श्याम तेंडोलकर आणि महेश तळगावकर यांनी केले.
या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडचे अध्यक्ष गौरव पारकर आणि कराओके कलाप्रेमी सिंगिंग क्लब देवगडच्या अध्यक्षा मनस्वी घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख गायकांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमात एकूण ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमावेळी रोटरी क्लबचे सेक्रेटरी रोटे. अनुश्री पारकर, खजिनदार दयानंद पाटील, रोटे. श्रीपाद पारकर, राजू भुजबळ, विजय बांदिवडेकर, अनिकेत बांदिवडेकर, रमाकांत आचरेकर तसेच कलाप्रेमी सिंगिंग क्लबचे किसन सूर्यवंशी, ज्योती तानवडे, मनीष मोंडकर आणि संजय पांचाळ उपस्थित होते.
या स्पर्धेच्या यशाबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यात रोटरी क्लब मँगो सिटीच्या सहकार्याने राज्यस्तरीय कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच प्राथमिक टप्प्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित स्पर्धांचेही नियोजन करण्यात येणार आहे. देवगडसह संपूर्ण जिल्ह्यातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.











