चिपळूण तालुक्यातील गुरव समाजाची एकजूट अशीच अभेद्य ठेवा- आ. शेखर निकम

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील गुरव समाजाची एकजुट जगाने प्रेरणा घ्यावी अशीच आहे. हा समाज संख्येने जरी कमी असला तरी ठायी ठायी या समाजाचे अस्तिव ठळकपणे दिसून येते. हिंदू धर्मामध्ये देवाच्या सर्वात जवळ असलेल्या या समाजाने आपली एकजूट अशीच अभेद्य ठेवा, असे प्रतिपादन चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी केले. दि. १८ जानेवारी २०२६ रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे चिपळूण तालुका गुरव समाजाच्या २७ व्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
आ. निकम पुढे म्हणालो की, मुळात गुरव समाज हा अत्यंत संवेदनशील आणि धार्मिक प्रवृत्तीचा असतो.चिपळूण तालुक्यातील गुरव समाज जरी संख्येने कमी असला तरी पिंपळी सारख्या मोक्याच्या ठिकाणी हा समाज स्वतःची जमीन घेतो आणि आपल्या अस्तित्वाची चुणूक आम्हा मंडळींना घ्यावयास भाग पडतो हे खूप कौतुकास्पद आहे. ज्यांनी कोणी ही जमीन गुरव समाजास दिली आहे त्यांचे खूप मोठे उपकार या समाजावर आहेत आणि गुरव समाजातील ज्या महान कार्यकर्त्यांनी एकीचे हे बीज पेरले त्यांनाही मनापासून दंडवत करतो. आमदार म्हणून माझ्या कक्षेत जे जे जमेल किंवा नाही जमणार तरी देखील या समाजाच्या सर्वतोपरी विकासासाठी प्रयत्न करेन” असे उद्गार यावेळी आ. निकम यांनी काढले. यावेळी कोळकेवाडी गावचे गुरव समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत कदम यांना आ. निकम यांच्या हस्ते “जीवनगौरव पुरस्कार आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर चिपळूण तालुका गुरव समाजाचे अध्यक्ष तुकाराम गुरव (गुरुजी), उपाध्यक्ष प्रकाश पवार, सचिव लवू बडदे, यशवंत कदम, चिपळूण पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश राणे, मुंबई गुरव माजी समाजाचे अध्यक्ष आणि दादर गावचे सुपुत्र सुनिल पवार, चिपळूण तालुका गुरव समाजाचे माजी अध्यक्ष विलास सकपाळ आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरव समाजाचे संचालक विजय कदम, नरेश निकम, विश्वनाथ सकपाळ आणि सचिन पवार यांनी केले.