चिपळूण नगरपालिकेची पुन्हा शहरातील रस्त्यालगतच्या अतिक्रमणावर कारवाई

चिपळूण (वार्ताहर) : मध्यवर्ती बसस्थानकासमोर हातगाडी लावण्यावरून दोघांमध्ये झालेली हाणामारी आणि त्यानंतर पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर आल्यानंतर चिपळूण नगरपालिका प्रशासनाने सोमवार दि. २८ रोजी पुन्हा शहरातील रस्ते, गटारे यावरील अतिक्रमणावरती कारवाई केली आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावरती पुन्हा सर्व टपऱ्या हातगाडीवाले यांच्यासमोर पेच प्रसंग उभा राहिला आहे.
शहरातील रस्ते व त्या लगेचच्या गटारावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेने केली होती. त्यानंतर पुन्हा काही महिन्यांचा अवधी गेल्यानंतर शहरात सर्वत्र हातगाड्या आणि टपऱ्या दिसू लागल्या. नगरपालिकेने हातगाड्यावाल्यांना रस्त्याच्या पासून ठराविक अंतरावरती गाडी किंवा टपऱ्या लावण्याच्या सूचना केली होती. त्यानुसार काही ठिकाणी त्या मुद्द्याचे पालन करण्यात आले होते. परंतु नंतर सर्वत्र अतिक्रमण झाल्याचे दिसून आले. त्यातच भर म्हणून शहरातील गजबजल्या मध्यवर्ती बसस्थानका समोर शनिवारी भर दुपारी हातगाडी लावण्याचे जागेवरून दोन विक्रेत्यांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद एवढा केला की मारामारी झाली. यामुळे परिसरात एकच चर्चा सुरू होती. या प्रकारामुळे अतिक्रमणांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नगरपालिका प्रशासनाने याबाबत कडक पावले आता उचलली आहेत. नगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. मात्र, आगामी काही दिवसांवरती गणेश उत्सव येणार असून यामुळे छोटे टपरीवाले, हातगाडीवाले, रस्त्याच्या कडेला बसणारे आणि व्यवसाय करणाऱ्यांची आता पुन्हा आर्थिक कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी बारा वाजता भोगाळे येथील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली. शहरात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली.