बोटीवरून खाडीच्या पाण्यात बुडून खलाशाचा मृत्यु

राजापूर प्रतिनिधी दारूच्या नशेत बोटीवरून खाडीच्या पाण्यात पडलेल्या खलाशाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील साखरीनाटे, डुंगेरी जेटी येथे घडली आहे. मदन हवल्दार चौधरी (23, राह.नेपाळ, सध्या साखरीनाटे नजफनगर) असे मयत खलाशाचे नाव आहे.
या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदन हवल्दार चौधरी हा तरूण मोहसिन अब्दुल्ला कोतवडकर यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. शुकवार दि.16 रोजी मदन हा दारूच्या नशेत बोटीवर कामासाठी आला होता. रात्री बोटीवरील सर्व खलाशी झोपलेले असताना मदन हा उशिरापर्यंत पार्सल आणलेली दारू पित बसला होता. दारूच्या नशेत त्याचा बोटीवरून तोल जावून तो खाडीच्या पाण्यात पडला. ही बाब सहकारी खलाशांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नव्हता.
अखेर त्याचा शोध सुरू असताना रविवार दि.18 रोजी जैतापूर खाडीतील नाटे डुंगेरी येथे पाण्यात मदन या मृतदेह आढळून आला. या प्रकरणी बोट मालक मोहसिन कोतवडकर यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.