सरपंच भाई नरे आणि सर्पमित्र राजू पडवळ यांची तत्परता
आचरा–अर्जुन बापर्डेकर
देवगड तालुक्यातील मिठबांव आगवणवाडी येथील रहिवासी सुलभा जेठे यांच्या घरी अचानक आलेल्या नागाला, श्री रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सरपंच भाई नरे यांच्या पुढाकारातून आणि चिंदर येथील सर्पमित्र राजू पडवळ यांच्या कौशल्यातून सुरक्षितपणे जीवदान देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिठबांव आगवणवाडी येथील सुलभा जेठे यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात हा नाग शिरला होता. त्याने खुराड्यातील कोंबडीचा फडशा पाडत अंडीही गिळंकृत केली होती.
या घटनेची माहिती मिळताच रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मिठबांवचे सरपंच भाई नरे यांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत चिंदर येथील प्रसिद्ध सर्पमित्र राजू पडवळ यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच सर्पमित्र राजू पडवळ यांनी विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सर्पमित्र राजू पडवळ यांनी अत्यंत कौशल्याने व सुरक्षितपणे नागाला रेस्क्यू करून गोणीत जेरबंद केले. यानंतर या विषारी नागाला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित अशा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.













