ऑनलाइन टास्क फ्रॉडमध्ये तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरची 3.50 लाखांची फसवणूक

पुण्यात ऑनलाइन अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या महिलेला मोबाईलवर आलेल्या मेसेजमधून टास्क फ्रॉडमध्ये ओढले गेले. सुरुवातीला छोट्या रकमेचे आमिष दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर हळूहळू मोठी रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने जाळ्यात ओढले

पुणे : हिंजवडी परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तिच्या मोबाईलवर ऑनलाइन अर्धवेळ नोकरीची ऑफर देणारा संदेश आला. ऑफर स्वीकारल्यानंतर सायबर भामट्यांनी तिची बँक माहिती मिळवली आणि तिला मोबाईल मेसेजिंग ॲपवरील एका ग्रुपमध्ये सामील करून घेतले, अशी माहिती प्रहार डिजिटलला पोलिसांनी दिली.

महिलेला इंटरनेटवर रेस्टॉरंट्सना रेटिंग देण्याचे टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात 150 रुपये जमा करण्यात आले. यामुळे विश्वास बसल्यानंतर आरोपींनी तिला प्रीपेड टास्क निवडण्यास सांगितले आणि अधिक कमाईचे आमिष दाखवले.

पैसे अडकवल्याचे सांगून अधिक रकमेची मागणी

पोलिसांच्या माहितीनुसार, 1 ते 4 ऑगस्ट या कालावधीत महिलेने आरोपींनी दिलेल्या बँक खात्यावर एकूण 3.50 लाख रुपये हस्तांतरित केले. मात्र, जेव्हा तिने पैसे परत काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी तिचे पैसे ट्रेडिंग ॲपमध्ये ब्लॉक झाल्याचे सांगितले.

पैसे परत मिळवण्यासाठी आणखी रक्कम ट्रान्सफर करण्याची मागणी केल्यानंतर महिलेला संशय आला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने ऑनलाइन तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.