चिपळूण तालुका वार्तापत्र

जि. प., पं. स. निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत
काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात; चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेतृत्वहीन!

संतोष सावर्डेकर/चिपळूण

गेल्या महिनाभरापूर्वी चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली. तर आत्ताच राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत प्रतिष्ठेची मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकून भाजपने देशाच्या आर्थिक राजधानीवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. २९ पैकी २४ महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येण्याएवढे संख्याबळ मिळाले आहे. नगरपरिषद, नगरपंचायत व आता महापालिकांमध्ये भाजप- शिवसेनेने यश संपादन केले असल्याने चिपळूणमधील शिवसेना भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी विश्वास दुणावला आहे. यामुळे शिवसेना-भाजप युती जि. प., पं. स. निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने देखील आपले उमेदवार निश्चित केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेतृत्वहीन झाला असल्याचे समोर येत आहे. तर काँग्रेसकडून अद्याप या निवडणुकीसाठी कोणतीही तयारी नसल्याचे समजते.

गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) -भाजप युतीने नगराध्यक्ष पदासह १६ जागांवर विजय संपादन केला. शिवसेना (शिंदे गट) ९ तर भाजपने ७ जागांवर यश संपादन केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन -दोन, शिवसेना उबाठा ५, काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे चिपळूण मधील जनतेने नवख्या उमेदवारांना चिपळूण नगरपरिषदेवर निवडून पाठवले आहे. या निवडणुका संपताच महाराष्ट्रात २९ महापालिकांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकीत देखील शिवसेना-भाजप युतीने दमदार यश मिळवले आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहे.

दरम्यान, जि. प., पं. स. निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली होती. तर आता या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षाने आपापल्या पक्षांचे उमेदवार निश्चित करण्यासाठी वेग घेतला आहे. तर दुसरीकडे राज्यात भाजप- शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष अशी महायुती असताना नुकत्याच झालेल्या चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत महायुती न होता शिवसेना-भाजप युती एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकी दरम्यान झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा केली. याचाच आधार घेत शिवसेना-भाजप युतीने देखील त्या दृष्टीने पावले टाकली आहेत आणि युतीच्या जागा वाटप देखील निश्चित झाले असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना-भाजप युती व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाने आपापले उमेदवार निश्चित केले असून उमेदवार देखील अंतर्गत प्रचाराला लागले आहेत. शिवसेना उबाठा देखील आपले उमेदवार निश्चित करीत आहेत. सोबत अन्य इच्छुकांची राजकीय पक्षांकडून मनधरणी केली जात आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसची भूमिका अजून समोर येत नसल्याने काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवसेनेकडून शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपकडून भाजप नेते प्रशांत यादव एकत्रितपणे निर्णय घेतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाची आ. शेखर निकम यांच्यावर सर्व जबाबदारी येऊन पडली आहे. यामुळे निकम यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकत ते भाजपवासी झाले. भाजपने देखील यादव यांच्यावर चिपळूण नगर परिषद निवडणुकीसाठी संयोजक पदाची जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी यादव यांनी युतीच्या समन्वयातून भाजपच्या जागा वाढविण्यात यश मिळवले. माजी आमदार रमेश कदम यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात उतरले खरे मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत वरिष्ठांनी तितकीशी साथ न दिल्याने रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यादव व कदमांच्या राजीनाम्यामुळे चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सध्या तरी नेतृत्वहीन झाला असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचा वारू पाहता चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता तरी कोणी नेतृत्व मिळेल का? याबाबत साशंकता आहे.