रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाच्या वतीने प्रयत्न, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट.
चिपळूण (प्रतिनिधी): रत्नागिरी शहरातील राजा थिबा मीन कालीन बुद्ध विहाराच्या आरक्षित जागेत सामूहिक केंद्र (कम्युनिटी सेंटर ) उभारण्याबाबत झालेल्या विवादात्मक परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाच्या वतीने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिल्हा शाखा रत्नागिरी आणि राजा थिबा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट, रत्नागिरी या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यासंदर्भात लवकरच सन्मानजनक तोडगा काढला जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा महासंघाच्या वतीने गुरुवारी (१७जुलै) जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांना निवेदनही देण्यात आले आहे.
महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांना दिलेल्या निवेदनात भगवान बुद्ध विहार आणि सामूहिक केंद्र या दोन्ही संकल्पना, हेतू ध्येय ,इमारत रचना ,स्थापत्य, कला आणि मानवी श्रद्धा उपयुक्तता या आधारावर परस्पर विरोधी असल्याचे नमूद करून रत्नागिरी येथील थिबा राजाचे बुद्ध विहार प्रयोजनासाठी राखीव असलेल्या मिळकतीमध्ये बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात यावी. जेणेकरून भारताचे संविधान अनुच्छेद 25 आणि 26 अंतर्गत बौद्ध धर्मीयांचे धार्मिक हक्कांचे संरक्षण होईल. तसेच दि पूजा स्थळ (विशेष तरतुदी) अधिनियम 1991 मधील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही. माननीय दिवाणी न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार बुद्ध विहार जमीन लगतच्या अन्य ठिकाणी प्रस्तावित सामूहिक केंद्र (कम्युनिटी सेंटर) उभारण्यात यावे, अशी महासंघाच्या वतीने यावेळी मागणी करण्यात आली आहे .
रत्नागिरी येथील थिबा राजाचे बुद्ध विहार या मिळकतीमध्ये प्रस्तावित सामुहिक केंद्राची उभारणी करताना जिल्ह्यातील विविध संघटना अंतर्गत निर्माण झालेला वाद विवाद संपुष्टात आणण्याच्या हेतूने शासन प्रशासनाने पुढाकार घेऊन सन्माननीय तोडगा काढावा , अशी महासंघाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. याप्रकरणी माननीय जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी या प्रकरणाची सखोलपणे तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. याबाबत रत्नागिरी जिल्हा महासंघाने या प्रश्न दोन्ही बाजूकडील संघटनांचे संवाद साधला. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिल्हा शाखा रत्नागिरी आणि थिबा राजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरी यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधून या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढावा व हा प्रश्न बौद्ध जनतेच्या अस्मितेला धरून सुटावा अशी विनंती केली. त्यानुसार दोन्ही बाजूकडील लोकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सामाजिक धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते, बौद्ध धर्मीय लोक यांच्या समावेत लवकरच बैठक घेऊन बौद्ध धर्मीयांच्या हिताचा तोडगा काढण्याचा महासंघाच्या वतीने प्रयत्न केला जाईल, असे जाहीर करण्यात आले .
यावेळी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाचे सभापती श्री वि ल मोहिते, अध्यक्ष विठोबा पवार, सरचिटणीस चंद्रकांत तांबे, उपाध्यक्ष सिद्धार्थ सावंत यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात महासंघाच्या वतीने पुढील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे – मौजे झाडगाव रत्नागिरी भूमापन क्रमांक 248 /1/1 नगर भूमापन क्रमांक 2879 मिळकती मधील आरक्षित जागेत केवळ बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात यावी. मौजे झाडगाव रत्नागिरी येथील सर्वे नंबर 248/1/1 मिळकती मधील राखीव जमीन क्षेत्रात बुद्ध विहार ऐवजी अन्य कोणत्याही प्रयोजना खाली सामूहिक केंद्र किंवा तत्सम उपक्रमाचे बांधकाम करण्यात येऊ नये. ज्यामुळे भारताच्या संविधान अनुच्छेद 25 ,26 आणि दि पूजा स्थळ कायदा 1991 अधीन बौद्ध धर्मीयांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण होईल. या आरक्षित मिळकतीमध्ये केवळ बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात यावी. शासनाने यापूर्वीच मंजूर केलेल्या सुमारे सात कोटी रुपयांचा निधी अंतर्गत रत्नागिरी येथे माननीय दिवाणी न्यायालय व माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी त्यांच्या निर्णयात नोंदवलेल्या निरीक्षणा नुसार अस्तित्वातील बुद्ध विहार जमीन लगतच्या अन्य ठिकाणी प्रस्तावित सामूहिक केंद्र (कम्युनिटी सेंटर) उभारण्यात यावे, जेणेकरून बौद्ध संस्कृती व वारसा यांचे जतन व संवर्धन करणे शक्य होईल असे म्हटले आहे.
याखेरीज महासंघाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील बुद्ध लेणी चैत्य शिल्प , बौद्ध धर्मातील ऐतिहासिक स्मारक, स्थळे यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्याबाबत संचालक, पुरातत्त्व व वास्तुसंग्रहालयाचे संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनाही स्वतंत्रपणे निवेदन देण्यात आले असून रत्नागिरी शहरातील थिबा कालीन बुद्ध विहाराचे निर्मिती करणे, खेड तालुक्यातील एसटी बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या बुद्ध लेण्यांचे संरक्षण करणे, मौजे दापोलीतील पन्हाळी दुर्ग येथील कोंडाजाई नदीच्या तीरावरील 29 प्राचीन बुद्ध लेण्यांचे संवर्धन करणे, राजापूर तालुक्यातील मौजे कोडवली, मौजे शेजवली, मौजे पांगरे येथील गुहा लेणीचे संवर्धन, चिपळूण तालुक्यातील बावशेवाडी तसेच कोळकेवाडी येथील बुद्ध लेणी, चैत्यशिल्प यांचे संरक्षण करणे . या संदर्भात त्यांचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी मागणी केली आहे.













