2050 पर्यंत बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळे उत्तरेकडे वळणार; ओडिशा-पश्चिम बंगालसाठी वाढता धोका

IITM पुण्याचा अभ्यास; मान्सूननंतरच्या चक्रीवादळांच्या मार्गात मोठा बदल

तामिळनाडू-आंध्र प्रदेशसाठी दिलासा, पूर्व किनाऱ्यावर नवे आव्हान

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (IITM) पुणे येथील नव्या अभ्यासानुसार 2050 पर्यंत बंगालच्या उपसागरातील मान्सूनोत्तर चक्रीवादळे लक्षणीयरीत्या उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशामध्ये चक्रीवादळांची तीव्रता आणि वारंवारता वाढू शकते. सध्या अधिक प्रभावित असलेल्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसाठी मात्र हा बदल दिलासादायक ठरू शकतो. उच्च-रिझोल्यूशन हवामान मॉडेल्सच्या आधारे हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. अभ्यासामुळे भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत.


पुणे : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे यांनी केलेल्या नव्या अभ्यासात 2050 पर्यंत बंगालच्या उपसागरातील मान्सूनोत्तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळे उत्तरेकडे सरकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा या भागांमध्ये चक्रीवादळ क्रिया वाढण्याची शक्यता आहे, तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशवरील धोका कमी होऊ शकतो.

या अभ्यासात उच्च-रिझोल्यूशन हवामान मॉडेल्स वापरून 2050 पर्यंतच्या चक्रीवादळ नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. संशोधनानुसार उत्तर-ईशान्य दिशेने जाणाऱ्या चक्रीवादळांचे प्रमाण सध्याच्या 21.2 टक्क्यांवरून 31.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, तर पश्चिम-वायव्य दिशेने जाणारी चक्रीवादळे घटतील.

अभ्यासाचे सहलेखक डॉ. अनंत पारेख यांनी सांगितले की, भविष्यात चक्रीवादळांचे मार्ग अधिक उत्तरेकडे वळतील. याचा अर्थ भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिशा आणि पश्चिम बंगाल, तसेच पुढे बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने अधिक चक्रीवादळे सरकतील. यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसाठी काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

सध्या बंगालच्या उपसागरातील बहुतांश चक्रीवादळे उत्तर-वायव्य दिशेने सरकून आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला धडकतात. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या मान्सूननंतरच्या चक्रीवादळांवर या अभ्यासात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

हे अंदाज SSP5-8.5 या सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन परिदृश्यावर आधारित असून 2015 ते 2050 या नजीकच्या भविष्यकाळासाठी लागू आहेत. आधीच्या मॉडेल्सपेक्षा हे अंदाज अधिक विश्वासार्ह असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

अभ्यासात असेही आढळून आले की, वरच्या पातळीच्या वातावरणातील वाऱ्यांमधील बदल हे या उत्तरेकडील शिफ्टचे प्रमुख कारण आहेत. पश्चिम आणि मध्य बंगालच्या उपसागरावर वाढलेले पश्चिमेकडील वारे आणि उत्तरेकडील भागावर मजबूत दक्षिणेकडील वारे यामुळे चक्रीवादळे पश्चिमेकडे न जाता उत्तरेकडे वळत आहेत.

दरम्यान, या संशोधनात चक्रीवादळग्रस्त भागांमध्ये आपत्ती तयारी अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. भविष्यातील चक्रीवादळ मार्गांचा विचार करता, बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरील देशांवर होणाऱ्या संभाव्य प्रतिकूल परिणामांबाबत हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

हा अभ्यास सायंटिफिक रिपोर्ट्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून ऋषिकेश अडसूळ, विनीत कुमार सिंग, अनंत पारेख आणि IITM पुणे येथील हवामान परिवर्तनशीलता व भविष्यवाणी विभागातील सी. ज्ञानसीलन यांनी हे संशोधन केले आहे.