नाशिक एअर शोवर तिकीट आकारणीचा वाद; सूर्यकिरण प्रदर्शनावर सेवानिवृत्त IAF अधिकाऱ्यांची नाराजी

परंपरेला छेद देत पहिल्यांदाच शुल्क, संरक्षण दलाच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह

गर्दी व्यवस्थापनाच्या नावाखाली ‘कर’ लावल्याचा नागरिकांचा आरोप

२२ आणि २३ जानेवारी रोजी नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या प्रसिद्ध सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या प्रदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने २०० ते ८०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरेने देशभरात हा शो सर्वसामान्यांसाठी विनामूल्य असतो. त्यामुळे या निर्णयावर सेवानिवृत्त IAF अधिकाऱ्यांसह नागरिकांकडून तीव्र टीका होत आहे. प्रशासन मात्र गर्दी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षेचे कारण पुढे करत आहे. या निर्णयामुळे एअर शोच्या मूळ उद्दिष्टावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.


पुणे : २२ आणि २३ जानेवारी रोजी गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या एअर शोसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने नागरिकांकडून २०० ते ८०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये प्रथमच होणारा हा शो दरवर्षी देशातील विविध शहरांमध्ये विनामूल्य आयोजित केला जातो. त्यामुळे या निर्णयावर सेवानिवृत्त IAF अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्लीतील एका वरिष्ठ IAF अधिकाऱ्यांनी प्रहार डिजिटलला सांगितले की, सूर्यकिरण प्रदर्शनाचा मुख्य उद्देश तरुणांना सशस्त्र दलात करिअरसाठी प्रेरित करणे आणि IAFची कौशल्ये व व्यावसायिकता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. “लोकांकडून शो पाहण्यासाठी शुल्क आकारले जाणे आमच्यासाठी धक्कादायक आणि नवीन आहे. हा मुद्दा संरक्षण मंत्रालयाकडे मांडला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या निर्णयाचा बचाव करत गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षेचे कारण पुढे केले. “संकलित केलेली रक्कम महाराष्ट्र सैनिक कल्याण विभागाकडे दिली जाईल. सार्वजनिक सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी चेन्नईतील मागील एअर शोदरम्यान झालेल्या मृत्यूचा संदर्भ देत, अशा घटना टाळण्यासाठी उपाय आवश्यक असल्याचे नमूद केले.

मात्र, IAF अधिकाऱ्यांनी हा युक्तिवाद फेटाळत, चेन्नईतील मृत्यू हे गर्दीमुळे नव्हे तर उष्माघातामुळे झाल्याचे स्पष्ट केले. “प्रशासनाने एकाहून अधिक व्ह्यूइंग पॉईंट्स खुले ठेवले असते तर गर्दीचा ताण कमी झाला असता. एरोबॅटिक शो अनेक किलोमीटर अंतरावरूनही पाहता येतो,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी बेंगळुरूतील एरो इंडियाचे उदाहरण देत, तेथे कोणतीही गर्दी व्यवस्थापनाची अडचण येत नसल्याचे नमूद केले.

या निर्णयावर स्थानिक नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. गंगापूर रोड येथील सम्राट जाधव यांनी विचारले की, “कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांकडूनही सरकार शुल्क आकारणार का?” ते म्हणाले, “जर रक्कम सैनिक कल्याणासाठी असेल तर आम्ही योगदान देण्यास तयार आहोत, पण गर्दी व्यवस्थापनासाठी कर लावण्याचा युक्तिवाद मान्य नाही.”

महाविद्यालयीन विद्यार्थिनी अद्विका पाटील हिने सांगितले की, संरक्षण दलांबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या कार्यक्रमासाठी तिकीट आकारणे आश्चर्यकारक आहे. तर अंकुश चव्हाण, जनसंपर्क अधिकारी (संरक्षण), पुणे यांनी प्रहार डिजिटलला सांगितले की, “IAF शोसाठी कधीही शुल्क आकारले जात नाही. जिल्हा प्रशासनाचा निर्णय असून आमची त्यात कोणतीही भूमिका नाही.”

दरम्यान, काही नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थनही केले आहे. आकांक्षा कुलकर्णी म्हणाल्या, “जर बसण्याची व्यवस्था, पाणी यांसारख्या सुविधा दिल्या जात असतील तर टोकन शुल्क चुकीचे नाही. हे चित्रपटाच्या तिकिटापेक्षा कमी आहे.” विशेष म्हणजे, फक्त ३० मिनिटांच्या एरोबॅटिक डिस्प्लेसाठी धरण परिसरातील खासगी हॉटेल्स व रेस्टॉरंट्सनी ३०० ते ३,००० रुपये दर जाहीर केल्यानेही चर्चा रंगली आहे.