जामगे पंचायत समिती गणात थेट लढत; अपक्ष सुसंध्या मोरे यांची निवडणुकीतून माघार

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील जामगे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार सुसंध्या संतोष मोरे यांनी आपली उमेदवारी माघार घेतल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. पंचायत समिती सदस्य पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तो वैधही ठरला होता. मात्र आज शुक्रवार, २३ जानेवारी रोजी त्यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
सुसंध्या मोरे यांच्या माघारीनंतर आता जामगे पंचायत समिती गणात शिवसेनेच्या उमेदवार नयना वीरसेने मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अपूर्वा हर्षल जाधव यांच्यात थेट सामना होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत आणखी वाढली असून दोन्ही प्रमुख पक्षांची आता थेट लढत याठिकाणी पहावयास मिळणार आहे.
जामगे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास भाई कदम तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे मूळ गाव असून, या संपूर्ण विभागासह तालुक्यात शिवसेनेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण परिसरात भगव्या वातावरणाचे वर्चस्व असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अपूर्वा हर्षल जाधव यांना या लढतीत कितपत यश मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या थेट लढतीमुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असून जामगे पंचायत समिती गणातील ही निवडणूक खेड तालुक्यातील महत्त्वाच्या आणि चुरशीच्या लढतींपैकी एक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.