खेड (प्रतिनिधी) – घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, लवेल येथे २२ जानेवारी २०२६ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन समारंभास उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे, क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा. सचिन ढवळे तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक संजय बोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, डॉजबॉल, फुटबॉल आणि ॲथलेटिक्स अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. महाविद्यालयातील मुलं आणि मुली मिळून एकूण ३७० विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धांचे आयोजन शिस्तबद्ध आणि खेळाडूंमध्ये खेळभावना, संघभावना तसेच शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. क्रीडा महोत्सवाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य, चिकाटी आणि क्रीडा वृत्तीचे प्रभावी दर्शन घडवले. प्रत्येक स्पर्धेत चुरशीचे सामने पाहायला मिळाले, ज्यामुळे महोत्सवाची रंगत अधिकच वाढली. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल क्रीडा समिती, आयोजक, शिक्षक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. क्रीडा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात केले.











