सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अनुभवी स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना वैद्यकीय अधीक्षक (वर्ग-१) या पदावर बढती देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पद रिक्त होते. राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी या नियुक्तीला नुकतीच मंजुरी दिली आहे.
या निवडीसाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि युवराज लखमराजे भोसले यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
डॉ. ऐवळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली ३० वर्षे स्त्रीरोग तज्ञ म्हणून सेवा देत आहेत. १९९६ पासून त्यांनी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात दरमहा सरासरी १०० यशस्वी प्रसूती केल्या आहेत. त्यांनी १९९८ ते २००६ या काळात सावंतवाडीत, त्यानंतर २०१६ पर्यंत दोडामार्ग येथे आणि पुन्हा २०१७ ते २०२३ या काळात दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावली आहे. सध्या ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत.
त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि मातृ-शिशु आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.













