सावंतवाडीत गोवंश मांस साठवणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

बाहेरचावाडा परिसरातील घरात छापा : ८० किलो मांसासह दोन अटकेत

सावंतवाडी:सावंतवाडी शहरात एका घरात गोवंश मांस आणि गांजा साठवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ८० किलो गोवंश सदृश्य मांस जप्त केले असून, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सावंतवाडी बाहेरचावाडा येथील सर्फराज भाऊद्दीन ख्वाजा (वय ४५), सनोबर भाऊद्दीन ख्वाजा (वय ४०) यांच्या घरात गोवंश मांस गांजा साठवून ठेवल्याची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, जयेश खंदरकर, पीएसआय माधुरी मुळीक आणि सुमारे १५ अंमलदार यांच्या पथकाने संबंधित घराभोवती निगराणी ठेवून परिसराची झडती सुरू केली.

पोलिसांनी घरात प्रवेश करण्यासाठी विनंती केली असता, सुरुवातीला घरातील व्यक्तींनी दरवाजे उघडण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस जीपवरील अनाउन्स सिस्टीमचा वापर करत, “आम्ही कायदेशीर प्रक्रियेने काम करत असून, आपण दरवाजा न उघडल्यास आम्हाला दरवाजे-खिडक्या फोडून प्रवेश करावा लागेल,” असे जाहीर केले. या अनाउन्सिंगनंतर घरातील व्यक्तीने दरवाजा उघडला.

पोलिसांनी घरात प्रवेश करून घेतलेल्या सविस्तर झडतीमध्ये त्यांना सुमारे ८० किलो गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले आणि त्यांच्या समक्ष सदर मांसाचा पंचनामा केला.

या कारवाई दरम्यान, पोलिसांनी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा याच्या घरातून ८० किलो मांस, एक मोठा फ्रीझर, वजनकाटा, मांस कापण्याचा चाकू, प्लास्टिक पिशव्या इत्यादी साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा आणि सनोबर भाऊद्दीन ख्वाजा या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. सावंतवाडी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.