जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026: अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी 5 उमेदवारांची माघार

देवगड | प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (23 जानेवारी) एकूण 5 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 2 तर पंचायत समितीसाठी 3 उमेदवारांचा समावेश आहे. माघारीनंतर बहुतांश मतदारसंघांत निवडणुकीची चुरस कायम राहिली असून अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.

जिल्हा परिषदेसाठी एकूण 50 गटांमध्ये 231 उमेदवार रिंगणात आहेत. कणकवली गटात जिल्हा परिषदेसाठी 35 उमेदवारांपैकी 2 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित वैभववाडी, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या गटांत जिल्हा परिषदेसाठी कोणतीही माघार नोंदलेली नाही.

पंचायत समितीसाठी 100 गटांमध्ये एकूण 398 उमेदवार अंतिम रिंगणात असून कणकवली गटात 2 तर कुडाळ गटात 1 उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. उर्वरित गटांत उमेदवार कायम असल्याने बहुतांश ठिकाणी बहुपक्षीय लढती होणार असल्याचे चित्र आहे.

वैभववाडी गटात पंचायत समितीसाठी 22, देवगडमध्ये 37, मालवणमध्ये 52, वेंगुर्लामध्ये 51, सावंतवाडीत तब्बल 81 तर दोडामार्ग गटात 35 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवसानंतर निवडणूक प्रचाराला वेग येण्याची शक्यता असून पुढील दिवसांत राजकीय हालचाली वाढण्याची चिन्हे आहेत.