मसुरे | झुंजार पेडणेकर :राष्ट्रीय हरित सेना योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथे दिनांक २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका- मालवण या माध्यमिक शाळेचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय हरित सेना योजनेच्या अंतर्गत शाळेत स्थापन केलेल्या इको क्लब या विभागाच्या मार्फत सन २०२५- २६ या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेने एक पेड माँ के नाम, नेचर कॅम्प, आचरे जामडूल परिसर कांदळवन व नापणे धबधबा क्षेत्रभेट, पर्यावरणावर आधारित निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व्याख्याने तसेच जैव विविधतेवर आधारित विविध चित्रफिती दाखवून मुलांमध्ये आणि समाजामध्ये पर्यावरणाचे महत्त्व, वृक्ष लागवडीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि भविष्यामध्ये जंगलतोड, वाढते औद्योगीकरण आणि प्रदूषण, वाढती लोकसंख्या इत्यादीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांची विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जाणीव- जागृती घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम शाळेमार्फत राबविण्यात आले होते. याची दखल सिंधुदुर्ग जिल्हा वन अधिकाऱ्यांनी घेऊन प्रजासत्ताक दिनी शाळेचा गौरव करण्याचे पत्राद्वारे कळविले होते. शाळेतील साहाय्यक शिक्षक राष्ट्रीय हरित सेना विभागाचे प्रमुख प्रविण पारकर यांनी हा सन्मान स्वीकारला. याप्रसंगी विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग मा. श्री राजेंद्र मगदूम, सर्व तालुका वन अधिकारी व इतर कर्मचारी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अन्य निवड झालेल्या शाळांचे मुख्याध्यापक, हरित सेना योजना प्रमुख शिक्षक उपस्थित होते. हा सन्मान ओझर विद्यामंदिर परिवारातील संस्था, शालेय समिती, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विशेषत: शाळेतील माता पालक या सर्वांच्या एकत्रित सहकार्यामुळे प्राप्त झाल्याचे शाळेतील हरित सेना योजना प्रमुख श्री.प्रविण पारकर यांनी सांगितले.ओझर विद्यामंदिरचे हरित सेना विभागाचे उपक्रमशील शिक्षक प्रविण पारकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रशालेमध्ये विविध उपक्रम राबवून ओझर विद्यामंदिरला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, सचिव जी. एस. परब, विश्वस्त नंदकुमार राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.












