खेड (प्रतिनिधी) – खेड येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी), लवेल येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागामध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स, पीसीबी (प्रिंटेड सर्किट बोर्ड) आणि थ्रीडी प्रिंटिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रयोगशाळेचे उद्घाटन घरडा केमिकल्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आर. सी. कुलकर्णी तसेच घरडा सामाजिक संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. विनायक दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जीआयटीमधील ही अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळा रोबोनिक्स ऑटोमेशन सोल्युशन्सचे श्री. हृषीकेश एम. शिंगे यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली असून, उद्घाटनप्रसंगी ते आवर्जून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष व व्यावहारिक प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
या प्रयोगशाळेत रोबोटिक्स, पीसीबी डिझाईन व फॅब्रिकेशन तसेच थ्रीडी प्रिंटिंगसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण कोकण विभागामध्ये रोबोटिक्स क्षेत्रातील ही एक अग्रगण्य व तंत्रसुसज्ज प्रयोगशाळा ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना रोबोटिक्ससाठी लागणारे विविध सुटे भाग स्वतः डिझाईन करून थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून तयार करता येणार आहेत. तसेच पीसीबी डिझाईन, सर्किट डेव्हलपमेंट आणि प्रोटोटायपिंग यांसारख्या प्रक्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परिसरातील औद्योगिक वसाहतींच्या तांत्रिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार प्रकल्प विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून, याचा थेट फायदा त्यांच्या भविष्यातील रोजगाराच्या संधी तसेच स्टार्टअप उपक्रमांना होणार आहे.
या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. सचिन खेडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य व प्रेरणा दिली.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. डॉ. श्रीशैल मुचंडे यांनी केले. यावेळी विभागातील प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील तांत्रिक शिक्षणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.











