हुंड्याच्या मागणीमुळे छळाचा आरोप
आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
पुणे जिल्ह्यातील सरतापवाडी येथे एका विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. रोहन चौधरी यांची पत्नी दीप्ती चौधरी (३०) हिच्या मृत्यूप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गावच्या सरपंच सुनीता चौधरी आणि त्यांचा मुलगा रोहन यांना अटक करण्यात आली आहे. दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पुणे : रोहन चौधरी यांची पत्नी दीप्ती चौधरी (३०) हिच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी सरतापवाडी (ता. हवेली) येथील सरपंच सुनीता कारभारी चौधरी (५८) आणि त्यांचा मुलगा रोहन चौधरी (३१) यांना अटक केली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरातून ही कारवाई करण्यात आली.
दीप्ती चौधरी हिने शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आत्महत्या केली होती. सुरुवातीला या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, दीप्तीच्या आई हेमलता बाळासाहेब मगर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी कुटुंबीयांकडून दीप्तीचा सातत्याने छळ करण्यात येत होता आणि दहा लाख रुपयांच्या हुंड्याची वारंवार मागणी केली जात होती. याबाबत दीप्तीने तिच्या पालकांना फोनवरून माहिती दिली होती, असे तक्रारीत नमूद आहे.
अटक करण्यात आलेल्या सुनीता चौधरी आणि रोहन चौधरी यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कथित छळासंदर्भातील माहिती जाणून घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उरुळी कांचन परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.










