गोविळ येथे पार पडली राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा

स्पर्धेत गावठी गटात बाळा गुरव मारलेश्वर यांच्या गाडीने पटकावला प्रथम क्रमांक

स्पर्धेला प्रेक्षक आणि स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील गोविळ येथे आयोजित केलेल्या श्री आदिष्टी देवी प्रसन्न राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेत बाजारी बैलजोडी गटात रविराज लाखण तर गावठी गटामध्ये बाळू गुरव यांच्या बैलजोडी ने प्रथम क्रमांक पटकावला.श्रावण महोत्सवांतर्गत गोविळ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून देखील स्पर्धकांचा आणि प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत बाजारी बैलजोडी गटात रविराज गणेश लाखन यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक प्रभाकर पडवळकर,तृतीय क्रमांक द्वारकानाथ माने ,चौथा क्रमांक भारत रामजी कांबळे आणि पाचवा क्रमांक रमेश पावस्कर यांच्या बैल जोडीने पटकावला. गावठी बैजोडी गटात मारलेश्वर येथील बाळा गुरव यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अमोल गुरव (कनकाडी) यांच्या बैलजोडीने द्वितीय, आदिष्टीकृपा गोविळ यांचा तृतीय, शुभम सुर्वे (संगमेश्वर) चौथा आणि पाचवा क्रमांक समीर शिर्के (देवळे) आणि जय हनुमान (केळवली) यांना विभागून पाचवा क्रमांक देण्यात आला.या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके आणि ढाल देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गोविळ ग्रामस्थ मंडळाच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.ही स्पर्धा पाहण्यासाठी गोविळसह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते