प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी: तालुक्यातील आवळी बुद्रुक येथील अझरुद्दीन मुबारक अत्तार यांच्या नवजात बालकाचे प्राण वाचवणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कृतज्ञतेने आणि भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात सत्कार करण्यात आला.
अझर आत्तार यांचे नवजात बालक सी.पी.आर. रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक श्वसनाचा तीव्र त्रास सुरू झाला. तत्काळ शस्त्रक्रियेची गरज भासल्याने बालकास आस्टर आधार हॉस्पिटल येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळच्या वेळेस वाहतुकीने गजबजलेल्या रस्त्यांवरून रुग्णवाहिका चालक सुरेश कदम यांनी प्रसंगावधान राखत अवघ्या सात मिनिटांत बालकास सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले.
डॉ. मयूर कानडे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी व महेश जगदाळे मॅनेंजर ॲम्बुलन्स(CPR हॉस्पिटल) यांच्या अनमोल सहकार्याने वेळेत पोहचवले आणि यशस्वी शस्त्रक्रिया करून नवजात बालकाचे प्राण वाचवले. या प्रसंगात रुग्णवाहिका चालक व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटूंब कल्यान मंत्री श्री.प्रकाश अबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.हसन मुश्रीक यांच्या अनमोल सहकार्याने,तसेच डॉक्टरांच्या तत्परतेमुळेच आपले बाळ आज सुरक्षित असल्याची भावना अझर आत्तार यांनी व्यक्त केली.
या उपकारांची जाणीव ठेवत अझर अत्तार फ्रेंड सर्कलच्या वतीने रुग्णवाहिका चालक सुरेश कदम यांच्या निवासस्थानी(ठिकपुर्ली) या.राधानगरी येथे मित्र परिवारांना घेऊन जाऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी अझर अत्तार भावुक झाले. त्यांनी सुरेश कदम यांना आलिंगन देत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांतून मनापासून आभार मानले.
या भावनिक क्षणाने उपस्थितांची मनेही हेलावून गेली. रुग्णवाहिका चालक सुरेश कदम व डॉक्टर मंडळींनी केलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. मानवतेचे आणि सेवाभावाचे दर्शन घडवणारा हा प्रसंग समाजात प्रेरणादायी ठरला आहे.










