प्रशासनाचा वाघ अन् जनसामान्यांचा दादा हरपला : आ. दीपक केसरकर

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र एका कर्तव्यदक्ष आणि धडाडीच्या नेतृत्वाला मुकला आहे दादांच्या जाण्याने राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे,” अशा शब्दांत माजी मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी अतिशय भावूक प्रतिक्रिया दिली.

आ. केसरकर यांनी अजितदादांच्या कार्यशैलीचा गौरव करताना सांगितले की, अजितदादा हे अतिशय शिस्तप्रिय लोकनेता होते. पहाटे कामाला सुरुवात करून फाईल्सचा निपटारा करणारा आणि जनतेचे प्रश्न तडीस लावणारा असा हा लोकनेता होता. त्यांचे बोलणे कदाचित काहींना वाटले असेल, पण त्यांचे मन अत्यंत स्वच्छ आणि प्रेमळ होते.

त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी आग्रही होतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना आमचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. जेव्हा पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, तेव्हा दादांना मुख्यमंत्री करावे यासाठी शरद पवार साहेबांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात मी स्वतः होतो. मी पक्षात राहावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती, त्यांच्याकडून मिळालेले ते प्रेम मी कधीही विसरू शकत नाही.

अजित पवार यांच्यातील ‘अर्थमंत्री’ कसा होता, हे सांगताना केसरकर म्हणाले की, “राज्याच्या तिजोरीवर त्यांचा कडक अंकुश असायचा. माझ्यावर विश्वास टाकून त्यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडण्याची मोठी जबाबदारी दिली होती. कठोर निर्णय घेण्याची त्यांची वृत्ती राज्याच्या विकासासाठी प्रेरक होती.

राजकीय घडामोडींच्या काळातही त्यांनी माझ्याबद्दल ‘हा आम्ही घडवलेला कार्यकर्ता आहे’ असे गौरवोद्गार काढले होते. त्यांचे हे शब्द माझ्यासाठी कायमची शिदोरी राहतील.

अजितदादांच्या जाण्याने केवळ एका पक्षाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वा

हिली.