अहिल्यानगर पोलिसांच्या सेंट्रलाइज्ड स्टोअररूममधील धक्कादायक प्रकार उघड
अहिल्यानगर पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून जप्त केलेले अल्प्राझोलम ड्रग्स चोरीला गेल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी एका पोलिस हवालदारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली.
पुणे : एका कॉन्स्टेबलसह पाच जणांकडून जप्त करण्यात आलेले १०.७ किलो अल्प्राझोलम हे ड्रग्स गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अहिल्यानगर पोलिसांच्या सेंट्रलाइज्ड स्टोअररूममधून (मुद्देमाल कक्ष) चोरीला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मे २०२५ मध्ये अहिल्यानगर पोलिसांनी श्रीरामपूर परिसरात छापा टाकून अल्प्राझोलमचा मोठा साठा जप्त केला होता. हे ड्रग्स न्यायालयाच्या ताब्यात होते, मात्र ते मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आले होते.
तपासात असे समोर आले की, डिसेंबर २०२५ मध्ये मुद्देमाल कक्षातील सील तोडून अल्प्राझोलम चोरीला नेण्यात आले. या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस हवालदार श्याम गुजर याला अटक करण्यात आली आहे. गुजर हा त्या काळात अहिल्यानगर पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होता.
दरम्यान, शिरूर येथील पुणे–नगर महामार्गावर १०.७ किलो ड्रग्स जप्त केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी १८ जानेवारीपासून या प्रकरणाचा तपास सुरू करून एकामागून एक अटक कारवाई केली.
या प्रकरणात शिरूर येथील शादाब रियाज शेख, पारनेर येथील ज्ञानदेव शिंदे व हृषीकेश चित्तर, तसेच श्रीगोंदा येथील महेश गायकवाड यांनाही अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींवर एनडीपीएस (अंमली पदार्थ व सायकोट्रॉपिक सबस्टन्स) कायद्यान्वये शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसपी गिल यांनी सांगितले की, अहिल्यानगर पोलिसांना याबाबत पत्र पाठवून मुद्देमाल कक्षातून ड्रग्स कसे चोरले गेले याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कॉन्स्टेबलने जप्त ड्रग्सचे सील तोडून अल्प्राझोलम चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात इतर पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, या प्रश्नावर गिल म्हणाले, “तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी अल्प्राझोलमची अवैध विक्री करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला.”
या घटनेमुळे पोलीस यंत्रणेमधील अंतर्गत सुरक्षेवर आणि मुद्देमाल व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.










