दापोलीत 70 जिवंत गावठी बॉम्ब जप्त; एकाला अटक

दापोली (विशेष प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून दापोली तालुक्यात मोठी कारवाई करत तब्बल 70 जिवंत गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून रत्नागिरी पोलीस दलाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला बेकायदेशीर स्फोटक पदार्थांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागात पेट्रोलिंग करत असताना खेड–मंडणगड मार्गावरील मौजे मुगीज येथे सायंकाळी सुमारे 5.25 वाजता संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान सदर इसमाचे नाव प्रकाश राम जगताप, (वय 33 वर्षे, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थासदृश 70 जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे 2 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडे आढळलेले स्फोटक पदार्थ सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्यास तत्काळ अटक करण्यात आली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 15/2026 अंतर्गत भारतीय स्फोटक कायदा 1908 चे कलम 5 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 288 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात कठोर पावले उचलली जात असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास किंवा डायल 112 या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाने केले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.