लवकर निदान, त्वरित उपचार आणि दीर्घकालीन पुनर्वसनावर भर
न्यूरोलॉजिकल केअर अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर यांनी विशेष न्यूरोलॉजिकल केअर बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत समर्पित गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) क्लिनिक सुरू करण्याची घोषणा केली आहे. या क्लिनिकचा उद्देश लवकर निदान, वेळेवर उपचार आणि GBS रुग्णांसाठी दीर्घकालीन पुनर्वसन अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे हा आहे.
पुणे : ज्युपिटर हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजस देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या विशेष क्लिनिकची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, GBS हा दुर्मिळ पण गंभीर स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) न्यूरोलॉजिकल आजार असून, यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून परिधीय नसांवर हल्ला करते.
या आजारामुळे रुग्णांमध्ये वेगाने वाढणारी कमजोरी, पक्षाघात आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनास अडचण निर्माण होऊ शकते. न्यूरोलॉजिस्टांच्या मते, लवकर ओळख आणि त्वरित उपचार केल्यास गुंतागुंत कमी होते आणि रुग्ण बरे होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.
डॉ. राजस देशपांडे म्हणाले, “GBS वेगाने प्रगती करणारा आजार आहे. निदानात थोडासा विलंब जरी झाला तरी रुग्णाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच समर्पित GBS क्लिनिकद्वारे आम्ही लवकर निदान, त्वरित हस्तक्षेप आणि बहुविद्याशाखीय पद्धतीने रुग्णांचे सतत निरीक्षण करण्याची सुव्यवस्थित व्यवस्था उभारली आहे.”
यावेळी डॉ. शिवराज हुंगे, संचालक – न्यूरोलॉजी, ज्युपिटर हॉस्पिटल यांनी बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. “GBS चे उपचार केवळ तीव्र अवस्थेपुरते मर्यादित नसतात. अनेक रुग्णांना आयसीयू काळजी, श्वसन निरीक्षण, इम्युनोथेरपी आणि दीर्घकालीन पुनर्वसन आवश्यक असते. हे क्लिनिक न्यूरोलॉजिस्ट, क्रिटिकल केअर तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि पुनर्वसन तज्ञांना एकत्र आणून एंड-टू-एंड समन्वित उपचार देईल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, डॉ. राजेंद्र पाटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), ज्युपिटर हॉस्पिटल यांनी या उपक्रमाच्या व्यापक परिणामांवर भाष्य केले. “समर्पित GBS क्लिनिकमुळे प्रमाणित उपचार प्रोटोकॉल, जलद निर्णय प्रक्रिया आणि विभागांमधील अखंड समन्वय शक्य होतो. GBS सारख्या न्यूरोलॉजिकल आणीबाणीमध्ये वेळेवर हस्तक्षेप हा जीव वाचवणारा आणि पुनर्प्राप्ती निश्चित करणारा ठरतो,” असे त्यांनी नमूद केले.
या क्लिनिकला GBS-रेडी आयसीयू, प्रगत निदान सुविधा, बहुविद्याशाखीय गंभीर काळजी आणि सर्वसमावेशक पुनर्वसन सेवा यांचे पाठबळ देण्यात आले आहे. तसेच रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे शिक्षण यावर विशेष भर देण्यात येणार असून, अंगात कमजोरी, मुंग्या येणे, चालण्यात अडचण येणे अशी लवकर लक्षणे ओळखण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
याशिवाय, प्रत्येक रुग्णासाठी दीर्घकालीन काळजी आराखडा आणि मानसशास्त्रीय आधार सुनिश्चित करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे ज्युपिटर हॉस्पिटलने रुग्ण-प्रथम आणि सुलभ न्यूरोलॉजिकल केअर देण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी केली आहे.
विशेष पायाभूत सुविधा, तज्ज्ञ वैद्यकीय कौशल्य आणि एकात्मिक उपचार पद्धती यांच्या माध्यमातून पुणे व महाराष्ट्रातील रुग्णांचे आरोग्य परिणाम आणि जीवनमान सुधारण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.










