धोपेश्वर गणातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील विकास करण्यासाठी कटीबध्द –योगेश नकाशे

राजापूर (प्रतिनिधी): गेली कित्येक वर्षे मी सामाजिक व राजकिय क्षेत्रात काम करत आहे. चिखलगावचा सरपंच म्हणून दहा वर्षे मी काम केले आहे. ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न आणि समस्यांची आपल्याला चांगली जाण आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातुन माझ्या धोपेश्वर गणातील सर्वसामान्य जनतेच्या मनातील विकास करण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे धोपेश्वर पंचायत समिती गणातील शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार योगेश नकाशे यांनी सांगितले.
  एक तरूण सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेले व सलग दहा वर्षे चिखलगावचे सरपंचपद भूषविणारे योगेश नकाशे हे ग्रामीण भागातील विकासाची जाण असलेले नेतृत्व म्हणूनही ओळखले जातात. सन २००५ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून चिखलगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी त्यांची सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी सन २०१० मध्येही ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येत पुन्हा ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले. सलग दहा वर्षे ते सरपंच म्हणून कार्यरत होते. सध्या ते चिखलगाव ग्रामपंचायीतचे उपसरपंच म्हणून काम करत आहेत. आपल्या कार्यकाळात नकाशे यांनी गावच्या विकासाला गती दिली आहे. शासनाच्या विविध योजना गावात राबविताना त्यांनी गावातील रस्ते, विज, पाणी यांसारखे प्रश्न प्राधान्याने सोडविले आहेत. तर वैयक्तीक योजनांचा लाभार्थींना लाभ मिळवून देतानाच त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले आहे.
यापुर्वी त्यांनी पुर्वीच्या कोदवली पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविली होती. मात्र अल्प मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतरही ते कायमच या विभागात संपर्कात राहिले व या पंचायत समिती गणात येणाऱ्या विविध गाव व वाडी वस्तींतील विकास कामांसाठी ते प्रयत्नशील राहिलेले आहेत.
प्रशासनासह शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास असलेले योगेश नकाशे हे शिवसेना पक्षात कार्यरत आहेत. एक मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख असून ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना चांगली जाणीव आहे. आमदार किरण सामंत यांचे ते विश्वासू म्हणून ओळखले जातात.
चिखलगावचे नकाशे कुटुंबीय हे कायमच सामाजिक कामात अग्रेसर राहिलेले आहे. योगेश नकाशे यांचे वडिल चिखलगावचे पोलीस पाटील होते. तर त्यांचे कनिष्ठ बंधू महेश नकाशे हे वकिल असून ते देखील सामाजिक व राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत.
भविष्यात धोपेश्वर पंचायत समिती गणातील जनतेच्या विकासासाठी काम करण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी आपण निवडणूक लढवत असून जनतेचा चांगला पाठींबा मिळत असल्याचेही नकाशे यांनी नमुद केले.