महिलेचे फोटो मॉर्फ करून अश्लील बनविल्याप्रकरणी माजगावच्या तरुणाला अटक

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

​सावंतवाडी : एका महिलेचे फोटो एडिट करून ते अश्लील बनविल्याच्या धक्कादायक प्रकाराबाबत सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अंतोन लुईस देसा (वय ३६, रा. माजगाव-गरड) याला आयटी ॲक्ट (IT Act) अंतर्गत आज सकाळी ९ वाजता अटक करण्यात आली आहे.
​ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अंतोन देसा याने एका महिलेचे फोटो तांत्रिक कौशल्याचा वापर करून एडिट केले होते. हे फोटो अश्लील स्वरूपात रूपांतरित केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे केली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सावंतवाडी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.
​ ​पोलिसांनी संशयित आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले असता त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
​या प्रकरणाचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे. सायबर गुन्हेगारीच्या या वाढत्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.