चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवळकोटरोड येथील साजिद सरगुरोह यांच्या संपर्क कार्यालयात बुधवार दिनांक २६ जुलै रोजी आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह व अपना फाउंडेशन यांच्या माध्यमातून गोवळकोट परिसरात अनेक शासकीय योजनांचे शिबिर राबविण्यात आले आहेत. यावेळी श्री. सरगुरोह यांच्या गोवळकोट रोड येथील संपर्क कार्यालयात आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे शिबिर होणार असून सर्वसामान्य नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळावा याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंबातील व्यक्तीला कोणत्याही स्वरूपाचा आजार झाल्यास त्यावर उपचारासाठी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने प्राधिकृत केलेल्या शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये संबंधित रुग्णाला मोफत उपचार केले जातील. या शिबिराला येताना नागरिकांनी आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल सोबत आणणे आवश्यक आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी केले आहे.











