शेकडो कोंबड्यांही केल्या फस्त, वन खात्याने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
लांजा (प्रतिनिधी ) तालुक्यातील शिपोशी बाईंगगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून या बिबट्याने येथील विशाल बाईंग यांच्या गाईवर शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात त्या गायीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
तालुक्याच्या पूर्व भागातील शिपोशी बाईंग गाव या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून या बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले केले जात आहेत.. तसेच गावातील काही शेतकऱ्यांच्या कोंबड्या देखील या बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात काही शेतकऱ्यांची गुरे देखील मृत्युमुखी पडलेली आहेत.
शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विशाल बाईंग यांनी आपली गुरे घराशेजारी असलेल्या रानात चरायला सोडली होती. याचवेळी बिबट्याने या गुरांवर हल्ला केला. यामध्ये एका गाईचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान अशाप्रकारे बिबट्याच्या पाळीव जनावरांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे येथील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनखात्याने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.











