भुदरगडमध्ये भरारी पथकाची मोठी कारवाई…

३० लाखांचा कृषीपंप साठा जप्त…

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी कारवाई…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना भुदरगड तालुक्यातील निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १ हजार कृषि पंपाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंचायत समितीचे उमेदवार डॉ.युवराज येडुरे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने भुदरगड तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

डॉ.युवराज येडुरे हे भुदरगड तालुक्यातील कुर पंचायत समिती गणातून मनसेचे उमेदवार असून, त्यांच्या मार्फत कागल तालुक्यातील बोरवडे येथे कृषी साहित्य मिळण्यासाठी फॉर्म भरून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला प्राप्त झाली होती. भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना बोरवडे येथे बोलावून शनिवार (दि. ३१ ) रोजी सकाळपासून फॉर्म भरून घेणे व दुपारी साहित्य वाटप होणार असल्याची खात्री पथकाने केल्यानंतर पोलीस विभागाच्या उपस्थितीत थेट धाड टाकण्यात आली.

कारवाईदरम्यान शेतीसाठी तणनाशक व औषध फवारणीसाठी वापरण्यात येणारे १ हजार कृषी पंप आढळून आले. या साहित्याची अंदाजे किंमत ३० लाख रुपये असल्याचे समजते. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत मिळाल्याचे व अशासकीय संस्थेमार्फत (NGO) वाटप केले जात असल्याचे स्पष्टीकरण डॉ. येडुरे यांनी दिले.

मात्र, आचारसंहिता कालावधीत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून मतदारांवर प्रभाव टाकेल असे कोणतेही साहित्य वाटप करण्यास सक्त मनाई असल्याने भरारी पथकाने सर्व साहित्य जप्त केले.

ही कारवाई जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमांतर्गत नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने केली असून मुरगुड पोलीस पुढील तपास करत आहेत.