देवरूख : मुंबई विद्यापीठ आयोजित ५८ व्या युवा महोत्सवामध्ये क्रेडार संस्थेच्या देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन (डी कॅड) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नुकत्याच भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे पार पडलेल्या साउथ झोन युवा महोत्सवामध्ये तब्बल सोळा महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. नाट्य, नृत्य, संगीत, वाङ्मय, ललित कला अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जवळपास ६०० विद्यार्थी सहभागी झाले.
डी कॅड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांमध्ये चमक दाखवत पारितोषिके मिळविली.
ऑन दी स्पॉट पेंटिंग – मृणाल पंडित – प्रथम क्रमांक
कार्टूनिंग – देवाशिष पवार – प्रथम क्रमांक
रांगोळी – अमर राऊळ – द्वितीय क्रमांक
मेहेंदी डिझाईनिंग – अल्मा सोलकर – तृतीय क्रमांक
या सर्व विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली असून अंतिम स्पर्धा मुंबई विद्यापीठात होणार आहे. या पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीसाठी सरावाला सुरुवात केली आहे.
या यशामध्ये विद्यार्थ्यांना प्रा. अवधूत पोटफोडे व श्रीकांत जागुष्टे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष अजय पित्रे व भारती पित्रे, सेक्रेटरी विजय वीरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत मराठे, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.












