अर्थसंकल्पातील ट्रेकिंग-गिर्यारोहण घोषणेचे साहसी पर्यटन क्षेत्राकडून स्वागत

हिमालय, पूर्व-पश्चिम घाटात पर्यावरणपूरक पायवाटांचा विकास

साहसी पर्यटन मुख्य प्रवाहात आणण्याकडे महत्त्वाचे पाऊल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ट्रेकिंग आणि गिर्यारोहण पर्यटनाच्या विकासाबाबत केलेल्या घोषणेचे ट्रेकिंग संघटना आणि साहसी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. भारतात जागतिक दर्जाचे ट्रेकिंग आणि गिर्यारोहण अनुभव देण्याची मोठी क्षमता असल्याचे या घोषणेमध्ये नमूद करण्यात आले आहे. हिमालयीन भागात तसेच पूर्व आणि पश्चिम घाटात पर्यावरणपूरक पर्वतीय पायवाटा विकसित केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे साहसी पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संरचित पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेवर भर दिल्यास या क्षेत्राची खरी क्षमता खुली होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.


पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ट्रेकिंग आणि गिर्यारोहण पर्यटन क्षेत्राच्या विकासाची घोषणा केल्यानंतर ट्रेकिंग संघटना, उत्साही गिर्यारोहक आणि साहसी पर्यटन संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. भारतामध्ये जागतिक दर्जाचे ट्रेकिंग आणि गिर्यारोहण अनुभव देण्याची क्षमता आणि संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, निवडक हिमालयीन प्रदेशांमध्ये पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ पर्वतीय पायवाटा तसेच पूर्व आणि पश्चिम घाटातील महत्त्वाची ट्रेकिंग स्थळे विकसित केली जाणार आहेत. साहसी पर्यटन समुदाय या घोषणेकडे साहसी पर्यटनाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहत आहे.

अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, जरी या घोषणेमध्ये महाराष्ट्राचा थेट उल्लेख नसला तरी धोरणाचा हेतू उत्साहवर्धक आहे. “महत्त्वाचे म्हणजे ट्रेकिंग आणि गिर्यारोहण या क्षेत्राला पर्यटनाचा एक स्वतंत्र घटक म्हणून ओळख मिळत आहे. इतर राज्यांमध्ये विकास सुरू झाला की महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल,” असे ते म्हणाले.

ट्रेकिंग आणि गिर्यारोहणामुळे दुर्गम आणि डोंगराळ भागात आर्थिक समृद्धी येऊ शकते, असेही तज्ज्ञांचे मत आहे. या क्षेत्रातून रोजगारनिर्मिती, स्थानिक समुदायांना मदत आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याची मोठी क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास ट्रेकिंग पर्यटन परकीय चलनाचे महत्त्वाचे स्रोत ठरू शकते.

तथापि, या उपक्रमाचे यश पर्यावरण संरक्षण, क्षमता नियंत्रण आणि स्थानिक समुदायाच्या सहभागासह पायाभूत सुविधांचा विकास यामधील समतोल राखण्यावर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. सह्याद्रीतील ॲडव्हेंचर क्लब चालवणारे सागर दरेकर म्हणाले की, “सरकार या घोषणेची अंमलबजावणी कशी करते, यावरच खरी प्रगती अवलंबून आहे.”

याशिवाय, वनविभागाशी समन्वय अत्यावश्यक असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले आहे. “बहुतेक ट्रेकिंग स्थळे वनविभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे,” असे ट्रेकिंग संस्था चालवणारे आशिष माने यांनी सांगितले.