रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा; ३६ गंभीर आजारांच्या औषधांवर करमुक्ती

संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. कर्करोगासह इतर गंभीर आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या जीवनरक्षक औषधांवरील कर पूर्णपणे काढून टाकण्याची घोषणा सरकारने केली असून, त्यामुळे या आजारांवरील उपचारांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कर्करोग आणि अन्य गंभीर आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ३६ जीवनरक्षक औषधांना करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी सहा महत्त्वाच्या औषधांवर केवळ ५ टक्के कस्टम ड्युटी लागू करण्यात येणार आहे. महागड्या औषधांमुळे वाढत चाललेला वैद्यकीय खर्च लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून दीर्घकाळापासून औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी होत होती. आता या निर्णयामुळे कर्करोगासह गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कर्करोग हा अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आजार मानला जातो. त्याचे उपचार दीर्घकालीन आणि खर्चिक असतात. कर्करोगाच्या उपचारांसाठी विविध प्रकारची औषधे वापरली जातात, त्यात केमोथेरपीचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. आता केमोथेरपीसाठी वापरली जाणारी औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. फुफ्फुसांचा, स्तनाचा, अंडाशयाचा आणि रक्ताच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करो