दापोली: दापोली तालुक्यातील बोरीवली-आडीवाडी येथील ‘सातमाड नव्हणकरीण देवी’च्या मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील पितळी घंटा आणि तांब्याचे भांडे चोरून नेले असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.०० ते २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञाताने मंदिरात प्रवेश करून सुमारे ३ किलो वजनाची पितळी घंटा (किंमत ५,५०० रुपये) आणि सुमारे २ किलो वजनाचे तांब्याचे पसरट भांडे (किंमत ३,५०० रुपये) असा एकूण ९,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याप्रकरणी फिर्यादी गजानन रामचंद्र देपोलकर (वय ५०, रा. बोरीवली आडीवाडी) यांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री ८.१२ वाजता दाभोल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













