राणीसाहेब श्रद्धाराजे भोसले यांनी दिला पुत्ररत्नाला जन्म : संस्थानच्या २० व्या पिढीचा उदय
सावंतवाडी | प्रतिनिधी :
कोकणच्या इतिहासात आणि संस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या सावंतवाडी राजघराण्यात आज आनंदाची सनई वाजली आहे. सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी तथा माजी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले आणि युवराज लखमसावंत भोसले यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या शुभघटनेमुळे राजघराण्याच्या विसाव्या पिढीचा उदय झाला असून, संपूर्ण सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण पसरले आहे.
माता आणि बालकाची प्रकृती उत्तम
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खासगी रुग्णालयात आज सायंकाळी ही प्रसूती सुखरूप पार पडली. युवराज लखमसावंत भोसले यांनी स्वतः ही आनंदाची बातमी दिली असून, माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘नवा युवराज’ आल्याची बातमी समजताच राजवाड्यावर आणि सावंतवाडी शहरात एकच जल्लोष करण्यात आला.
*२० व्या पिढीचा उदय: ऐतिहासिक क्षण*
सावंतवाडी संस्थानला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. राजघराण्यात नवीन वारसाचे आगमन होणे, हा केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण संस्थानाच्या वारशासाठी महत्त्वाचा क्षण मानला जातो. २० व्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून या बालकाचे आगमन झाल्याने जुन्या पिढीतील जाणकारांनी आणि इतिहासप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
*शुभेच्छांचा वर्षाव*
राजघराण्यात पाळणा हलल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडिया, दूरध्वनी आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.
विविध पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधींनी राजघराण्याचे अभिनंदन केले आहे. सावंतवाडीच्या जनतेचे राजघराण्याशी जिव्हाळ्याचे नाते असल्याने, ‘आमच्या घराण्यातील पाहुणा’ अशा भावनेने सामान्य नागरिक आनंद व्यक्त
करत आहेत.













