श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली माहिती
मसुरे | झुंजार पेडणेकर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक २२/०९/२०२५ घटस्थापना ते गुरूवार दिनांक ०२/१०/२०२५ विजया दशमी दसरा अखेर श्री देवीजींची स्थापना व घटस्थापना व सोमवार दिनांक ६/१०/२०२५ रोजी कोजगारी पौर्णिमा साजरी करण्यात येणार असल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. पुढे बोलताना महेश इंगळे यांनी वटवृक्ष मंदिरातील नवरात्र महोत्सवास जुनी परंपरा असून या नवरात्री महोत्सवास अनन्य साधारण असे महत्व आहे. स्त्रीशक्तीच्या या उत्सवात अनेक माता, भगिनी या देवीजींचे दर्शन घेवून पावन होतात. या नवरात्र महोत्सव कालावधीत सालाबादा प्रमाणे यंदाही देवस्थानच्या वतीने शुक्रवार दिनांक २६/०९/२०२५ ते रविवार दिनांक २८/०९/२०२५ या कालावधीत सकाळी ९ ते ११ या वेळेत ३ दिवसीय “देवी महात्म्य” या पोथीच्या पारायण सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. ही “देवी महात्म्य” पोथीची पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही जास्तीत जास्त पुरुष व महीला भक्तांनी या पारायण सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन महेश इंगळे यांनी भाविकांना केले आहे. सोमवार दिनांक ६/१०/२०२५ कोजागरी पौर्णिमे रोजी देवस्थानकडुन महानैवेद्य दाखवून दुध प्रसाद वाटप होवून या उत्सवाची सांगता होईल अशी माहितीही महेश इंगळे यांनी दिली.












