आडेली जि. प. मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार: पालकमंत्री नितेश राणे

वेंगुर्ले : दाजी नाईक 

भाजपा नेते खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून आज आपण जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवीत आहोत. वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ आपल्याला पुढील कालावधीत रोजगार आणि पर्यटनदृष्टीने विकसित करावयाचा आहे. आज विरोधकाकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही म्हणूनच महायुतीला साथ द्या पालकमंत्री या नात्याने आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईन, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आडेली आंबेडकरनगर जाहीर प्रचार सभेत बोलताना दिली.

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातील जि. प. व पं. स. उमेदवार यांच्या प्रचारार्थ आडेली श्री देव चव्हाटा मंदिर नजिक आडेली आंबेडकरनगर येथे मंगळवारी रात्री उशिरा महायुतीची प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार दिपक केसरकर, भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी शरदजी चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आडेली गावचे मानकरी जयवंत धर्णे, दादा धर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव एम. के. गावडे, वेंगुर्ला नगरपरिषद नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई, आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ उमेदवार समिधा समीर नाईक, आडेली पं. स. उमेदवार नितीन मांजरेकर, वायंगणी पं. स. उमेदवार शीतल राऊत, आडेली सरपंच यशस्वी कोंडसकर, मठ सरपंच रुपाली नाईक, दाभोली सरपंच उदय गोवेकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, निरीक्षक व नगरसेविका शीतल आंगचेकर व संदेश निकम, सुमन निकम, सचिन शेट्ये, गौरी माईणकर, गौरी मराठे, आडेली ग्रा. पं. उपसरपंच परेश हळणकर, दाभोली उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर श्री. आडेलकर, सुधीर मुंडये, ग्रा. पं. सदस्य, माजी सदस्य विष्णू कोंडसकर, प्रशांत प्रभूखानोलकर, हर्षद साळगावकर आदी उपस्थित होते.

*मनीष दळवी यांना खा. नारायण राणे यांचा आहे वरदहस्त*

ना. राणे पुढे बोलताना म्हणाले, सर्वच सरपंच यांनी जोमाने काम करावे. प्रत्येक गावाला ५० लाख ते १ कोटी रुपये निधी देण्याची जबाबदारी आपली राहील. आज मनीष दळवी हे खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेत. मनीष दळवी हे लंबी रेस का घोडा असल्याने त्यांची चिंता करू नका. खा. नारायण राणे यांचा त्यांना वरदहस्त आहे, त्यामुळे २०२९ पर्यंत संयम ठेवा. या मतदारसंघात समुद्री कासवाच्या माध्यमातून पर्यटन विकास होण्यासाठी दरवर्षी कासव जत्रेचे आयोजन करावयाचे आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध योजना आणून विकास करावयाचा आहे. मनीष दळवी जिल्ह्याचे नेतृत्व करताहेत, त्यामुळे आडेली मतदार संघाच्या विकासासाठी जोमाने काम करा व तिन्ही उमेदवारांना मतदानरूपी आशीर्वाद द्या, या मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, असेही श्री. राणे म्हणाले.

*महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी साथ द्या : दीपक केसरकर*

यावेळी बोलताना आ. दिपक केसरकर म्हणाले, आडेली हा मतदारसंघ अतिशय सुंदर असा मतदारसंघ असून या मतदारसंघाला समुद्रकिनारे लाभलेले आहेत. जे महत्व तारकर्लीचे आहे, तसेच महत्व उभादांडा, वायंगणीचे आहे. त्यामुळे येथे विकासाचे पोटॅनशियल आहे. या मतदारसंघाचे सर्व सरपंच युतीचे आहेत. त्यामुळे येथील तिन्ही उमेदवार यांना भरघोस मतांनी साथ द्या, तुमच्या विकासाची सर्व जबाबदारी आमची राहील, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी व नितीन मांजरेकर यांनी आभार मानले. सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.