शिरगाव रिक्षा चालक–मालक संघाचा उद्या वर्धापनदिन सोहळा

शिरगाव (प्रतिनिधी) – शिरगाव येथील रिक्षा चालक–मालक संघाचा २२ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी शिरगाव बाजारपेठेतील मातोश्री कॉम्प्लेक्स येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, १० वाजता इयत्ता ५ वी ते ९ वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, ११ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, तर दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद होणार आहे.

दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदी–कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ३.३० वाजता कणकवली तालुक्यातील लोरे येथील श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ (बुवा रिया मेस्त्री) आणि मालवण तालुक्यातील अष्टविनायक प्रासादिक महिला भजन मंडळ (बुवा अंकिता गावडे) यांच्यात २०×२० महिला डबल-बारी भजनाचा सामना रंगणार आहे.
सायंकाळी ५ वाजता विद्यार्थी गुणगौरव समारंभ, तर सायं. ७.३० वाजता बुवा संतोष घाडी यांचे सुस्वर भजन आयोजित करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिक्षा चालक–मालक संघ शिरगावचे अध्यक्ष तारक चव्हाण व सचिव महेश ओंबळकर यांनी केले आहे.