देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली यांची पत्रकार परिषद
कुणकेश्वर :श्री क्षेत्र कुणकेश्वरची वार्षिक यात्रा दि. १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टकडून सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू असून भाविकांच्या सुरक्षिततेसह सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे. मंदिर परिसरात प्रथमच महिलांसाठी खास हिरकणी कक्ष उभारण्यात आला असून हा कक्ष कायमस्वरूपी कार्यान्वित राहणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यात्रा काळात भव्यमंडप, अखंडित विद्युत व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी रस्ते, मंदिरात गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेटिंग व मजबूत रेलिंग उभारण्यात आले आहे. स्वतंत्र स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांना योग्य जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने हेमंत वातकर, मंगेश पेडणेकर,संजय वाळके, दीपक घाडी उपस्थित होते
श्री तेली पुढे म्हणाले की यात्रेदरम्यान होणाऱ्या चोऱ्या, महिलांची छेडछाड यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी मंदिर व परिसरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यात जंबो कॅमेऱ्यांचाही समावेश आहे. देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक तसेच समुद्रकिनारी सागरी सुरक्षा दल तैनात राहणार आहे. देवगड महाविद्यालयाच्या वतीने १०० विद्यार्थी स्वयंसेवक प्रशासकीय यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाला मदतीसाठी कार्यरत असतील. या विद्यार्थ्यांना शोध व बचाव, प्रथमोपचार, बिनतारी संदेश यंत्रणा, पाण्यातील व्यक्ती बचाव याबाबत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
देवगड–मिठमुंबरी–तारामुंबरी पुलामार्गे समुद्रकिनाऱ्यालगत येणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने भाविक व प्रवाशांमध्ये नाराजी आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यंदा दर्शन अमावस्या १७ फेब्रुवारी रोजी असल्याने तिर्थस्नान व देवमेटीसाठी भाविकांना संपूर्ण दिवस उपलब्ध राहणार आहे. समुद्रकिनारी विद्युत व्यवस्था, पुरुष व महिलांसाठी कपडे बदलण्याची सोय तसेच पोलीस यंत्रणा व ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरक्षा पथके तैनात राहणार आहेत.
यात्रा परिसरात राजकीय व इतर बॅनर्समुळे असुरक्षितता निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले असून रस्त्यांवर कमानी उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पूजा साहित्य विक्रेते व व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापर व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
मान. प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीत वाहतूक, रस्ते, विद्युत, आरोग्य, पोलीस बंदोबस्त, पार्किंग, स्वयंसेवक व पाणीपुरवठा या मुद्द्यांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. पार्किंगसाठी अतिरिक्त वाळुमय जागा व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मोकळ्या जागेचे सपाटीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी अद्याप कार्यवाही न झाल्याने वाहतूक कोंडीची शक्यता व्यक्त करण्यात आली.
कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र तसेच देशभरात होणार असून परिसरात एलईडी स्क्रीनद्वारे दर्शनाची व्यवस्था असेल. भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन नियोजनात बदल करून सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा देवस्थान ट्रस्टमार्फत गुळबुंदी लाडू प्रसाद विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
श्री कुणकेश्वर मेटी व तिर्थस्नानासाठी येणाऱ्या देवस्वारींच्या समितींनी लवकरात लवकर देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा एकूण पाच देवस्वाऱ्यांची नोंद झाली असून पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून आगमन सुरू होणार आहे. त्यामुळे भाविकांनी दिवसभर दर्शनाचा लाभ घ्यावा व सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.








