भगवान खोत यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या वतीने सत्कार

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी भगवान दत्तात्रय खोत यांना सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती दिली आहे.

दरम्यान, मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या वतीने भगवान खोत यांचा बढती निमित्ताने सत्कार करण्यात आला.

भगवान दत्तात्तय खोत हे १ ऑगस्ट १९८८ रोजी आय. पी. एस अधिकारी वाय. सी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलिस दल, बल गट क्र. २ पुणे येथे भरती झाले. पुणे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ गडचिरोली, दिल्ली, गुजरात या ठिकाणी कर्तव्यदक्ष चालक म्हणून कामकाज पाहिले.

त्यानंतर मुंबई पोलिस दलात त्यांची बदली झाली. त्यांनी नायगाव, वरळी, ताडदेव याठिकाणी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले.

सिंधुदुर्ग पोलीस दलात बदली झाल्यानंतर त्यांनी देवगड सागरी सुरक्षा दल, निवती त्यांनंतर ओरोस येथे कर्तव्य बजावले. सध्या ते मालवण पोलिस दलात कार्यरत आहेत. या कालावधीत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांना वरिष्ठांकडून अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

या सेवाकाळात त्यांनी हवालदार म्हणून १२ वर्षे, पुढे सहाय्यक पोलिस फौजदार म्हणून ३ वर्षे कामकाज पाहिजे. सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी त्यांना पोलिस उपनिरिक्षक म्हणून बढती दिली आहे. बढती निमित्ताने, मालवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रवीण कोल्हे, अन्य अधिकारी व सहकारी कर्मचारी यांनी भगवान खोत यांचे अभिनंदन केले आहे.