सावंतवाडी | प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे लोकनेते तथा माजी मंत्री स्व. भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती माजगाव येथील ‘प्रेरणा’ समाधी स्थळावर उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून भाईसाहेबांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली.
भाईसाहेब सावंत यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत महसूल, ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची आणि दूरदृष्टीची आठवण यावेळी मान्यवरांनी करून दिली.
राज्याचे माजी मंत्री आमदार दीपकभाई केसरकर तसेच सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते समाधीवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाईसाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, माजी सभापती अशोक दळवी, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, पदाधिकारी अमोल सावंत, प्रदीप सावंत, अजित सावंत, व्हि. बी. नाईक, चंद्रकांत नाईक, संजय कानसे, रवींद्र म्हापसेकर, संदीप राणे, प्रसाद सावंत, म. ल. देसाई, राजू कुबल, सचिन बिर्जे, संजय लाड, अर्चित पोळके, मेघश्याम काजरेकर, प्रा. धीरेन्द्र होळीकर, एस. पी. नाईक आणि प्रा. सतीश बागवे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर एक मार्गदर्शक म्हणून भाईसाहेब सावंत यांचे जनमानसात असलेले स्थान या सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि सावंत कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणच्या विकासात भाईसाहेबांनी दिलेले योगदान आजही येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.












