जेसीआय फेस्टिव्हल २०२६ चे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न

खेड (प्रतिनिधी) : जेसीआय खेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जेसीआय फेस्टिव्हल २०२६ चे भव्य उद्घाटन माननीय श्रेया ताई कदम यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास गेस्ट ऑफ ऑनर म्हणून नगराध्यक्षा सौ. माधवी ताई बुटाला उपस्थित होत्या, तर विशेष उपस्थिती म्हणून माननीय विलासभाई बुटाला यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या उद्घाटन सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची हृदयस्पर्शी किनार लाभली. यावेळी माननीय श्रेया ताई कदम यांच्या हस्ते मनिषा मनोज धोत्रे (रा. निळवणे, ता. खेड) यांना घरघंटी प्रदान करण्यात आली. मनिता धोत्रे या निराधार गृहिणी असून त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. तीन मुलांचा सांभाळ करत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या संघर्ष करत असून, ही घरघंटी त्यांच्या स्वावलंबनासाठी मोलाची ठरणार आहे. जेसीआय खेडच्या या माणुसकीपूर्ण उपक्रमामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले आणि या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमात LTT स्कूल, ज्ञानदीप भाडगाव, ज्ञानदीप मोरवंडे-बोरज तसेच ओम साई ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नेत्रदीपक नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या दमदार, उत्स्फूर्त आणि तालबद्ध सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट मिळाला.
फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी खेड शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी फेस्टिव्हलचा मनमुराद आनंद घेत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
पुढील पाच दिवस हा फेस्टिव्हल सुरू राहणार असून या कालावधीत नागरिकांसाठी विविध मनोरंजनात्मक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना खेडवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फेस्टिव्हलचा आनंद घ्यावा, असे आवाहन जेसीआय खेडचे अध्यक्ष जेएफएम अमित नामुष्टे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विभागीय अध्यक्ष जेसी अमोल क्षीरसागर यांनी प्रभावीपणे केले.
जेसीआय फेस्टिव्हल २०२६ मुळे खेड शहरात आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून हा फेस्टिव्हल खेडकरांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरत आहे.