दाम्पत्यावर गुन्हा दाखल
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तुमच्या मुलाने माझ्या मुलाला का मारले असा जाब विचारल्याच्या रागातून हिंदू कॉलनी येथील एकाच अपार्टमेंटमधील दोन कुटुंबात बुधवार 4 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वा.सुमारास जोरदार राडा झाला. याप्रकरणी दाम्प्त्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनिफ मेमन आणि खूशबू मेमन (दोन्ही रा.हिंदू कॉलनी माशाअल्ला अपार्टमेंट,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्प्त्याचे नाव आहे. त्यांच्या विरोधात सना खालीद मजगावकर (33,रा.हिंदू कॉलनी माशाअल्ला अपार्टमेंट,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी सना मजगावकर या आपल्या नोकरीच्या ठिकाणी असताना त्यांच्या मुलाने त्यांना फोन करुन अपार्टमेंटमधीलच मेमन कुटुंबासोबत आपला वाद झाल्याचे सांगितले. दरम्यान, सना या सायंकाळी 6.30 वा.सुमारास घरी आल्यानंतर त्यांनी खूशबू मेमनला माझ्या मुलाला का मारले असे विचाले असता खूशबू आणि सना मजगावकर यांच्यात शाब्दिक वाद झाला.
त्यानंतर सना या आपल्या फ्लॅटमध्ये गेल्या असताना रात्री 8 वा.सुमारास आपल्याला जाब विचारल्याच्या रागातून खूशबू मेमन आणि तिचा पती हनिफ मेमन हे दोघे सना मजगावकर यांच्या फ्लॅटमध्ये घूसले. हनिफ मेमनने आपल्या हातातील लोखंडी रॉड खालीद मजागावकरच्या डोक्यावर मारला. पतीला वाचवण्यासाठी सनामध्ये पडली असता खूशबू मेमनने तिच्या तोंडावर मारुन पूर्ण चेहऱ्यावर नखांनी ओरखडले. त्यानंतर हनिफ मेमन फिर्यादी सनाच्या अंगावर आला असता पती खालीदने त्याला पकडले. तरीही त्याने तिच्या डोक्यावर रॉडने वार केला. या झटापटीत सना यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून खूशबूच्या हातात गेल्याने ते मिळून आले नाही. या राड्यात गंभिर जखमी झालेल्या मजगावकर दाम्प्त्याला बुधवारी रात्री उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोन्ही कुटुंबांच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने जिल्हा शासकिय रुग्णालयात मोठा जमाव गोळा केला होता. शहर पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात धाव घेत जमावाला आपआपल्या घरी जाण्यास सांगितल्याने मोठा अनर्थ टळला.











