आमदार निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा; रस्त्याच्या कामातील महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण
ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील तोंडवळी–तळाशील (सुरुचे वन मार्गांवरील) प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३३ च्या विशेष दुरुस्ती कामाला महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (MCZMA) सीआरझेड अंतर्गत सशर्त पर्यावरणीय परवानगी दिली आहे. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे ही परवानगी प्राप्त झाली असून, रस्त्याच्या दुरुस्ती कामातील महत्त्वपूर्ण प्रशासकीय टप्पा पूर्ण झाला आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर प्राधिकरणाच्या २४ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या २०२ व्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला होता. त्यानुसार याबाबत मंजुरीचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. प्रस्तावित रस्त्याची लांबी ८७७.३३ मीटर असून रुंदी ७.५ मीटर आहे. किनारपट्टीच्या पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर ही मंजुरी देण्यात आली आहे. कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
तोंडवळी आणि तळाशील गावांना जोडणारा हा रस्ता स्थानिक ग्रामस्थांच्या दैनंदिन दळणवळणासह पर्यटन आणि व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होण्यासह परिसरातील पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक पर्यावरणीय परवानगी मिळाल्याबद्दल तसेच विकासकामांसाठी दिलेल्या सकारात्मक पाठबळाबद्दल खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे ग्रामस्थ यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.











